Ad will apear here
Next
स्वामी चक्रजित : वेदप्रणित योगासने आणि योगोपचार यांचे प्रवर्तक


स्वामी चक्रजित
यांनी योगसाधनेतील सर्व उच्च स्थिती प्राप्त केल्या होत्या. योगाचा प्रसार हे त्यांच्या आयुष्याचं एक ध्येय होतं. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी योगाच्या प्रशिक्षणाने उच्च पदावर आरूढ केलं. त्यांचा समाधीचा प्रयोग पुण्यात झाला होता. तो घडवून आणण्याच्या प्रक्रियेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर सहभागी होते. ‘किमया’ सदरात आज त्याबद्दल... 
..............
काही काही व्यक्तींच्या भेटी योगायोगाने होतात, किंबहुना तसे योगच असतात. त्यातून पुढे काही कार्य घडायचं असतं. १९८२च्या दरम्यान मी तसाच स्वामी चक्रजित यांना भेटलो. पुण्यातील सध्याच्या अत्रे सभागृहामागील एका गल्लीत त्यांचा बंगला होता. माझे काही मित्र त्यांच्याकडे योगासने शिकत असत. त्यांच्याबद्दल कुतूहल आणि प्रेम निर्माण झालं. चर्चा होऊ लागल्या. योग, सिद्धी, अध्यात्म हे त्यातले प्रमुख विषय होते. स्वामीजी प्रापंचिक होते; पत्नी आणि दोन मुलं होती. त्यांची एक प्रदीर्घ मुलाखत घेतली. ते शिकवत असलेल्या महत्त्वाच्या योगासनांची सचित्र, स्पष्टीकरणासह पुस्तिका छापली. नंतर त्यांचा एक आगळावेगळा, अद्भुत कार्यक्रम घडवून आणला. पुढे तो बघणारच आहोत.

स्वामीजींचं चरित्र उलगडण्याआधी भारतीय अध्यात्मातील काही संज्ञांचा थोडक्यात परिचय करून घेऊ.

षट्चक्रे :
१) मूलाधार २) स्वाधिष्ठान ३) मणिपूर ४) अनाहत ५) विशुद्ध ६) आज्ञा. त्यांची स्थाने अनुक्रमे अशी आहेत - पाठीच्या कण्याच्या तळाशी, लिंग, नाभी, हृदय, कंठ, भूमध्य (दोन भुवयांच्या मध्ये). सातवे चक्र सहस्रदल (ब्रह्मरंध्र) - त्याचे स्थान मूर्ध्नि (टाळूच्या मधोमध डोक्यावर). 



कुंडलिनी शक्ती मूलाधार चक्रापाशी वेटोळे घालून बसलेली असते. अध्यात्मात साधनेद्वारे जसजशी प्रगती होते, तशी ती जागृत होऊन वरच्या दिशेने वाटचाल करू लागते. एक एक चक्र भेदल्यावर विलक्षण दिव्य अनुभूती येतात. सुवाद, नाद आणि प्रकाश यांचा अनुभव येतो. ज्ञानप्राप्ती झालेला योगी (व्यक्ती) आपले प्राण ब्रह्मरंध्रातून सोडतो आणि परब्रह्माशी एकरूप होतो.

अष्टमहायोग : योगासनांच्या अभ्यासातून प्रथम शारीरिक क्षमता वाढवून पुढे समाधी अवस्थेपर्यंत पोहोचणं, हे लक्ष्य असतं. चित्त आणि वृत्तींचा निरोध म्हणजे योग, अशी व्याख्या पातंजल योग दर्शनात केलेली आहे. त्याचेही चार प्रकार आहेत. लययोग, मंत्रयोग, हठयोग आणि राजयोग. हठयोगाद्वारे शरीरावर नियंत्रण मिळवून मन ताब्यात आणायचं असतं, तर राजयोगातून मन नियंत्रणात आणून शरीर ताब्यात ठेवायचं असतं. योगाची आठ अंगं आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. साधकाला या क्रमानेच समाधी अवस्थेपर्यंत जाता येतं. पूर्वजन्मी ज्यांची तपश्चर्या झालेली असते, त्यांना हा नियम लागू नाही. त्यांची प्रगती वेगानं होते.

अष्टमहासिद्धी : सिद्धींचे आठ प्रकार आहेत. आध्यात्मिक प्रगती होत असताना त्या आपोआप प्राप्त होत असतात; परंतु त्यात न अडकता पुढील वाटचाल करावयाची असते. सहजगत्या काही गोष्टी (चमत्कार) घडल्यास त्याला महत्त्व देऊ नये किंवा तेच करत बसू नये. ‘चमत्कार दाखविल्याशिवाय नमस्कार मिळत नाहीत,’ एवढ्यापुरता त्याचा उपयोग करावा. त्या सिद्धी अशा आहेत. १) अणिमा : सूक्ष्म रूप धारण करता येणं. २) महिमा : विशाल रूप धारण करणं. ३) गरिमा : वजन खूप वाढवणं ४) लघिमा : खूप हलकं होणं. ५) प्राप्ती : कुठलीही गोष्ट निर्माण करता येणं. ६) प्राकाम्य : कोणतंही रूप धारण करता येणं. पाण्यावर चालणं, आकाशात उडणं. ७) ईशिता : सत्ता, प्रभुत्व प्राप्ती, त्यावर नियंत्रण. इच्छा झाल्यास राज्यप्राप्तीही होते. एक प्रकारे ईश्वराचेच रूप. ८) वशिता : जीवन-मृत्यूवर नियंत्रण. जड, चेतन, जीव-जंतू, सर्व पदार्थ आणि प्रकृती या सगळ्यांना वश करणं.

सविकल्प समाधी : यालाच संप्रज्ञात समाधी असंही म्हणतात. एखाद्या वस्तूवर, विचारावर लक्ष केंद्रित करून जगाचा विसर. मी आणि ‘तो’ एकच असल्याची जाणीव, अहंकाराचा विलय.

निर्विकल्प समाधी : यात अहंकार आणि संस्कार नाहीसे होऊन चैतन्याची, ‘जागृती’ची उच्च स्थिती प्राप्त होते. तिथे मनाला अस्तित्व नाही. कल्पनातीत शांती आणि दिव्य आनंद मिळतो.

सहज समाधी : प्रपंचातील दैनंदिन व्यवहार चालू असताना आतून स्थितप्रज्ञ. रमण महर्षींसह अनेक संत त्या स्थितीत असत. निर्लेप अवस्था (कशाचाही मनावर परिणाम नाही) आणि अखंड शांती.

वर उल्लेख केलेल्या सर्व उच्च स्थिती स्वामी चक्रजित यांनी प्राप्त केल्या होत्या. योगाचा प्रसार हे त्यांच्या आयुष्याचं एक ध्येय होतं. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी योगाच्या प्रशिक्षणाने उच्च पदावर आरूढ केलं.



स्वामीजींचा जन्म १२ एप्रिल १९१५ रोजी झाला. त्यांचं मूळ नाव रामचंद्र घाटे. त्यांची स्मृती अत्यंत तीव्र होती. दवाखान्यात जन्म झाल्यानंतर खिडकीला पडदे कोणत्या रंगाचे होते, हेसुद्धा त्यांच्या लक्षात होतं. साधारणपणे पाच वर्षांपर्यंच्या गोष्टी, घटना आपल्याला आठवत नाहीत. त्याही त्यांना स्पष्ट आठवत होत्या. लहानपणापासूनच त्यांची अंतर्स्थिती साधूचीच होती. शिक्षण आणि लग्न झाल्यावर ते गुजरातमध्ये ‘एरोनॉटिक्स इंजिनीअर’ म्हणून काम करत होते. त्यांना हिमालयाची प्रचंड ओढ वाटत होती. परिणामी, एक दिवस ते सरळ घराबाहेर पडले आणि जवळच्या रेल्वे स्टेशनवर पोहोचले. खिशात किती पैसे होते, याचाही विचार त्यांनी केला नाही. कुठे जायचं हेही ठाऊक नव्हतं. प्लॅटफॉर्मवर टीसीने त्यांना तिकीट दाखवायला सांगितलं. कुणी तरी ते दाखवलं आणि त्यांनीच स्वामीजींना रेल्वेच्या वरच्या वर्गात नेऊन बसवलं.

प्रवास किती वेळ चालला हे त्यांना कळलं नाही. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कुमाव विभागातील ‘काठगोदाम’ स्टेशनवर असंच कोणी तरी त्यांना झोपेतून उठवलं आणि एका बस स्थानकावर नेलं. त्यांच्या हातात तिकीट देऊन बसमध्ये बसवलं. अंतिम ठिकाणी उतरल्यावर सहा वर्षांचा एक मुलगा त्यांच्याजवळ आला. त्याने कैलास-मानसरोवराकडे निघालेल्या काही लोकांजवळ त्यांना आणून सोडलं. ते अल्मोडा गाव होतं, हे स्वामींना चांगलं आठवतं. त्या लोकांबरोबर खूप लांबचा प्रवास झाला. खाण्या-पिण्याची काहीच व्यवस्था नव्हती. लोकांना त्यांच्याबद्दल आश्चर्य वाटत होतं. उच्च आध्यात्मिक प्राप्तीसाठी ते हिमालयात चालले होते, यावर कोणाचा विश्वास बसला नाही.

मानसरोवर आल्यावर त्यांना अत्यानंद झाला. जिथे पोहोचायचं होतं, तेच हे ठिकाण अशी त्यांची खात्री झाली. पुढचा प्रवास त्यांनी एकट्याने सुरू केला. अनेक चढ-उतार ओलांडले. तिथेच योगाचा अभ्यास सुरू झाला. तसाच काही काळ गेला. मग हिमवर्षाव होऊ लागला. त्यातच ते गाडले गेले आणि हळूहळू बेशुद्ध पडले. शुद्ध आली तेव्हा ते एका मोठ्या गुहेत पोहोचलेले होते. ते स्वप्न नव्हतं, याची त्यांनी खात्री करून घेतली. गुहेत ते थोडे इकडे-तिकडे फिरले. अचानक त्यांना समोर एक महापुरुष ध्यानाच्या स्थितीत बसलेला दिसला. तशी तेज:पुंज, विशाल व्यक्ती त्यांनी आयुष्यात कधीच पाहिलेली नव्हती. मांडी घालून बसलेले ते ऋषी स्वामीजींच्या उंचीपेक्षाही वर दिसत होते. ते प्रत्यक्ष व्यास महर्षी होते. डोळे बंद असलेल्या अवस्थेतही त्यांनी जणू स्वामींचा ताबा घेतला. त्यांचं शरीर आणि मन योगाच्या अनेक क्रिया करू लागलं. श्वासावर पूर्णपणे नियंत्रण आलं. अतींद्रिय शक्ती आणि ज्ञान प्राप्त होत गेलं आणि आत्मसाक्षात्कार झाला. विशेष म्हणजे त्या गुरू-शिष्यांमध्ये एका अक्षराचाही संवाद नव्हता. सहा महिन्यांचा काळ गेला. गुरूंनी त्यांना संसारी जगतात परतण्याची आज्ञा दिली. तत्पूर्वी, कैलास पर्वतावर जाऊन स्वामीजींनी शंकराचे तांडव-नृत्य पाहिलं.

जसे ते हिमालयात पोहोचले, तसंच एक दिवस दिल्ली स्टेशनवर त्यांना सोडण्यात आलं. हातात तिकीट मिळालं आणि मुंबईवरून पुण्याला घरी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी इच्छुकांना योगाचं शिक्षण द्यायला सुरुवात केली. सन १९६७मध्ये ते स्वत: होऊन प्रख्यात डॉ. ह. वि. सरदेसाई यांच्याकडे गेले. योगशास्त्राचा अभ्यास केल्यास वैद्यकीय कारकिर्दीला त्याचा खूप उपयोग होईल, असं त्यांना सांगितलं. डॉक्टरांनीही तात्काळ होकार दिला. पुढील सहा वर्षं स्वामीजी पहाटे पाचला डॉक्टरांकडे जात होते. उत्तम ध्यान लागण्यापर्यंत डॉक्टरांची प्रगती झाली. पुढे त्यांनीही लेख आणि भाषणांमधून योगाचे महत्त्व लोकांना समजावून सांगितलं. स्वामीजींचं हे चरित्र अविश्वसनीय वाटू शकेल. परंतु त्यांचा वैयक्तिक स्वार्थ कुठेच दिसून येत नाही. पैसा आणि प्रसिद्धीपासून ते दूर होते. बुवाबाजीचा प्रश्नच नव्हता. त्यांचं जीवन अत्यंत साधं आणि विनम्रतेने भरलेलं होते. मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांचा जन्म झाला होता. ते कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी पाच जून १९९२ रोजी ७८व्या वर्षी शांतपणे देह सोडला.

हिमालयात असताना स्वामीजींनी अनेक दिव्य अनुभव घेतले. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. प्रत्येक सिद्धीचा प्रयोग त्यांनी करून पाहिला. घरी परतल्यावर मात्र त्यांचा उपयोग कधीही करून घेतला नाही. समाधीचे सर्व प्रकार साध्य केले. एका समाधीच्या अवस्थेत श्वास पूर्णपणे थांबतो. साधनेनुसार तो काळ काही सेकंद, मिनिटं, तास, दिवस किंवा महिनेसुद्धा असू शकतो. स्वामीजींची स्थिती उच्च कोटीची होती. ठरावीक काळाचा संकल्प करून ते श्वास थांबवू शकत. पृथ्वीवर बाह्य वातावरण, प्रदूषण, आवाज यांच्या परिणामांमुळे समाधी भंग पावू शकते. दूर अरण्यातील गुहेत तसले त्रास कमी संभवतात. म्हणूनच ऋषिमुनी गुहेत, एकांतामधील आश्रमात तपश्चर्या करत. जमिनीखालीही बंदिस्त अवस्थेत पूर्ण शांतता लाभू शकते. तसा एक प्रयोग स्वामीजींनी १९८०च्या आधी गोव्यात, मडगावमध्ये केला होता. सर्व बाजूंनी बंद केलेल्या जमिनीखालच्या खोलीत सुमारे बारा तास ते समाधिमग्न झाले. आत प्राणवायू मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. याचा अर्थ त्यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला होता. शेकडो लोकांनी ते प्रत्यक्ष पाहिलं होतं.

जमिनीखालील समाधी 
स्वामीजींचा परिचय झाल्यानंतर त्याविषयी चर्चा होत असे. पुण्यातही गोव्याप्रमाणेच समाधिप्रयोग व्हावा, अशी इच्छा काही मित्रांनी व्यक्त केली. तशी व्यवस्था झाल्यास आपली तयारी आहे, असं स्वामीजींनी सांगितलं. अपेक्षा काहीच नव्हती. पहिल्यापेक्षा काळ थोडा वाढवून चौदा तासांचा असावा, असंही ठरलं. आम्ही मित्रमंडळी कामाला लागलो. प्रथम मैदान ठरवणं आवश्यक होतं. मी जिथे शिकलो, त्या गरवारे महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून संमती मिळवली. समाधीच्या प्रयोगात प्राणांना धोका असल्यामुळे पोलिसांची परवानगी काढणं बंधनकारक होतं. जमिनीखाली खड्डा कुठे, किती असावा, तेही ठरलं. सात मे १९८३ रोजी (शनिवारी) सायंकाळी सहा वाजता स्वामीजींनी जमिनीखालील खोलीत प्रवेश करायचा आणि वरून ती भक्कमपणे बंद करायची, अशी योजना ठरली. मैदानावर सर्वांना मुक्त प्रवेश असणार होता.

डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनमधून परवानगी काढली. कार्यक्रमाच्या वेळी दोन पोलिस पूर्ण वेळ तैनात करण्यात आले. महेश राजवाडे नावाचा माझा एक आर्किटेक्ट मित्र होता. ‘टिमवि’च्या ‘इंडालॉजी’ वर्गात त्याची ओळख झाली होती. त्यानेच मला स्वामीजींकडे नेले होते. त्याने जमिनीखालची खोली बांधण्याची जबाबदारी घेतली. त्याप्रमाणे, तीन फूट रुंद, चार फूट लांब आणि साडेतीन फूट खोल खड्डा घेण्यात आला. आतून त्याला सिमेंटचा गिलावा देण्यात आला. आदल्या दिवशीच ते काम झाल्यामुळे ‘भिंती’ सुकल्या.

सात मेचा दिवस उजाडला. वृत्तपत्रांत बातमी दिलेली होती. डॉ. प. वि. वर्तक, डॉ. थत्ते आणि अन्य काही प्राध्यापक/शास्त्रज्ञ हजर राहणार होते. सायंकाळी पाचनंतर लोक यायला सुरुवात झाली, पाहुणेही आले. त्यांनी ‘खोलीत’ काही (जीवशास्त्र व जैवरसायनाशी संबंधित) उपकरणं ठेवली. स्वामीजी ठरलेल्या वेळी हजर झाले आणि सहा वाजता ‘आत’ शिरले. वरून ‘तीन बाय चार’पेक्षा थोडं मोठं झाकण ठेवण्यात आलं आणि त्यावर सिमेंटचा ‘स्लॅब’ बनवण्यात आला. आता हवा आत-बाहेर होण्याची शक्यता नव्हती. काही पत्रकार हजर होते. थोड्या वेळाने ते आणि जमलेले लोक निघून गेले. सकाळी आठ वाजता स्लॅब फोडून स्वामीजींना बाहेर काढायचं होतं. आम्ही चार-पाच मित्र आणि दोन पोलिस तेवढे तिथे थांबलो. थोडी भीती, हुरहुर आणि उत्सुकता होतीच. आम्ही थोडं खाऊन घेतलं.

अंधार झाला. हळूहळू वेळ पुढे जात होता. नऊ-दहा-अकरा... आणि रात्री बाराच्या सुमारास खोलीच्या आतून काही ठोकल्यासारखा आवाज येऊ लागला. लक्षपूर्वक ऐकल्यावर तो नक्की तिथूनच येत होता, हे निश्चित झालं. राजवाडे आणि आम्ही लगेच धावलो. दोन कामगारही होते. कुदळीचे घाव घालून ‘स्लॅब’ तातडीने फोडण्यात आला. झाकण दूर केलं आणि स्वामीजींना त्वरित वर काढण्यात आलं. ते शांत होते; पण बोलण्याच्या मनःस्थितीत नव्हते. ‘सकाळी आठ वाजता पुन्हा इथे येऊन मी सर्व स्पष्टीकरण देईन,’ असं सांगून ते घरी निघून गेले. आम्ही डॉ. वर्तकांना लगेच फोन लावला. तेही सकाळी येतो, असं म्हणाले.

आम्ही चार-पाच मित्र मात्र तिथेच थांबलो. पॅव्हेलियनच्या बैठकींवरच आडवे झालो. सकाळी साडेसातला स्वामीजी हजर झाले. डॉ. वर्तक आणि काही लोक आले. पत्रकार सतीश कामत उपस्थित होता. आमच्यासह सर्व जण स्वामीजींच्या निवेदनाची आतुरतेने वाट बघत होतो. अखेर त्यांनी सुरुवात केली. ते म्हणाले, ‘आत बसल्यावर हळूहळू एकाग्र होत मी समाधी अवस्थेकडे जात होतो. श्वास मंद होऊ लागला. तेवढ्यात काही अतृप्त जीवात्मे (भुते) तिथे आले आणि म्हणू लागले, की ‘ही आमची जागा आहे, इथे थांबू नका. तुमच्या समाधी-प्रयोगाचा आम्हाला त्रास होत आहे.’ तरीही मी बैठक तशीच ठेवली. त्या जिवांचा तगादा चालूच राहिला. त्यामुळे श्वास संपूर्ण बंद होणं अशक्य झालं. म्हणून मी छताला ठोकू लागलो. कॉलेज नदीजवळ आहे. इथे पूर्वी स्मानभूमी होती, हे आधी ठाऊक नव्हतं.’

थत्ते आणि वर्तकांनी आत ठेवलेली उपकरणं पाहिली. सायंकाळी सहा ते रात्री १२ असा सहा तासांचा काळ लोटला होता. तेवढा वेळ आत थांबणं हेसुद्धा सामान्य माणसाला अशक्य होतं. डॉ. वर्तकांनी तो समाधीचा प्रयोग यशस्वीच झाला, असं जाहीर केलं. स्वामीजींसह आम्ही सर्व जण आपापल्या घरी गेलो. रात्रभर जागरण झालं; पण तो विलक्षण अनुभव होता.

स्वामीजींनी ‘समाधी’चा तसा प्रयोग पुन्हा केला नाही. त्यांनी केलेलं अपयशाचं स्पष्टीकरण सगळ्यांना मान्य होणार नाही; तथापि अध्यात्म, पुनर्जन्म, मृतात्मे हे विषय सध्याच्या विज्ञानाच्या कक्षेबाहेरचे आहेत. त्यावर मोठ्या प्रमाणात जगभर संशोधन मात्र सुरू आहे. आज ना उद्या विज्ञान आणि अध्यात्मातील सीमारेषा पुसली जाईल.

स्वामीजींची त्यानंतरही भेट होत राहिली. काही गूढ विषयांबाबत आमच्या ज्ञानात भर पडत गेली. समाधीचा तो प्रयोग होऊन आज तीन तपं लोटली, तरीही ती घटना अजूनही मनात ताजी आहे. चार दिवसांपूर्वी ‘गरवारे’त गेलो असताना त्याचं स्मरण झालं आणि त्यालाच हे लेखनरूप मिळालं.

- रवींद्र गुर्जर
संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/YZUCCF
Similar Posts
प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज दोन्ही डोळ्यांनी अंध असूनही गुलाबराव महाराजांना वेदान्त तत्त्वज्ञान आणि भौतिक व आध्यात्मिक शास्त्रांचे सखोल ज्ञान होते. म्हणूनच त्यांना ‘प्रज्ञाचक्षू मधुराद्वैताचार्य’ म्हटले जाई. अनेक विषयांवर त्यांनी सखोल साहित्यनिर्मिती केली. २० सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन. त्या निमित्ताने, ‘किमया’ सदरात ज्येष्ठ
हरिद्वारच्या भारतमाता मंदिराचे संस्थापक स्वामी सत्यमित्रानंद गिरी मानवता धर्माच्या प्रसारासाठी, आध्यात्मिक ज्ञान समाजात रुजवण्यासाठी आपले सर्व जीवन ज्यांनी व्यतीत केले त्या स्वामी सत्यमित्रानंदजींचे नुकतेच, २५ जून २०१९ रोजी दीर्घ आजारानंतर निधन झाले. हरिद्वारमध्ये भारतमाता मंदिराची स्थापना हे त्यांचे एक मोठे कार्य ठरले. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज
उपनिषदांचे अंतरंग (उत्तरार्ध) ‘किमया’ सदराच्या गेल्या आठवड्यातील भागात ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र गुर्जर यांनी पाच उपनिषदांची ओळख करून दिली. आजच्या लेखात आणखी काही उपनिषदांबद्दल...
उपनिषदांचे अंतरंग वेद, उपनिषदे म्हणजे ज्ञानाचे प्राचीन भांडार आहे. यातील उपनिषदांचे अंतरंग उलगडून सांगत आहेत ज्येष्ठ लेखक, अनुवादक रवींद्र गुर्जर... त्यांच्या ‘किमया’ या सदरातून...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language